औरंगाबाद: मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादचे मिनिमंत्रालय म्हणजेच जिल्हा परिषद कार्यालयात खुद्द जिल्हा परिषद सदस्यांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष नाही, याबाबत सर्वसाधारण सभेमध्ये ठराव होऊनही त्याबाबत अंमलबजावणी केली जात नसल्याची खंत जि.प. सदस्य मधुकर वालतुरे यांनी व्यक्त केली आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारल्या जावा असा ठराव पारित करण्यात आला होता. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड यांनी जि.प. उद्यानातील जागेची पाहणी करून तेथेच कक्ष उभारणीबाबत निश्चिती केली होती. परंतु पुढे माशी कुठे शिंकली, ते कळाले नाही. त्यानंतर त्यांची बदली झाली. त्यांच्या जागेवर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पवनीत कौर आल्या त्या तरी या कामी सक्रीय होतील, असे वाटले होते, परंतु त्याही दुर्लक्ष करीत आहेत.
जिल्हाभरातील ग्रामीण भागातून ग्रामस्थ आपले प्रशासकीय काम करून घेण्यासाठी जिल्हा परिषदेत येत असतात. ते आपल्या गटातील जिल्हा परिषद सदस्यांचा शोध घेतात, परंतु ते नेमके कोठे बसतात हेच त्यांना कळत नाही, कारण त्यांच्या बसण्याची निश्चित अशी जागा नाही. यासाठी जिल्हा परिषद सदस्यांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारावा, अशी मागणी मधुकर वालपुरे यांनी केले आहे.











